ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा, महिलांचे स्थानिक प्रश्न सोडविण्याची ताकद ग्रामसभेत आहे. गरज आहे, महिलांना त्याची जाणीव करुन देण्याची आणि प्रोत्साहनाची. जिमलगट्टासारख्या अत्यंत दुर्गम भागात ग्रामसभेच्या निमित्ताने आलेले अनुभव उमेदच्या सहका-यांसाठी लाखमोलाचे ठरणारे आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात काम करत असताना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. एक तर हा भाग दुर्गम. रस्त्यांच्या सोयी नाहीत. ये-जा करण्यासाठी वाहनांचीही सोय नाही. महत्वाची अडचण म्हणजे, बोलीभाषेची. मराठी, गोंडी, माडिया, बंगाली आणि तेलगू भाषा या भागात बोलल्या जातात. लोकांशी सवांद साधायचा म्हणजे जिकरीचे काम असते. या परिसरात चेह-यावरचे हावभावसुद्धा संवादात मोलाची भूमिका बजावतात. इथल्या स्थानिकांशी बोलत असताना एका नव्याच भाषेचा शोध लागला. तो म्हणजे मराठी आणि हिंदींची सरमिसळ असलेली असलेली भाषा. या भाषेला विशिष्ट नाव नसले, तरी उभयतांना समजू शकेल इतपत संवाद साधता येवू शकतो. अशा भागात १५ ऑगस्टच्या पाश्र्वभूमीवर महिला ग्रामसभा घेण्याचे उमेदच्या सर्व सहका-यांनी ठरविले. तालुक्यातील एखाद्या गावातील स्वयंसहायता बचतगटातील महिलांना ग्रामसभेत हजर राहण्यास प्रेरित करायचे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या नियोजनात त्यांचा सहभाग वाढवायचा असा यामागे हेतू होता. महिला ग्रामसभा घेण्याबाबत उमेदच्या तालुका अभियान कक्षात नियोजन करण्यात आले. माझ्यावर जिमलगट्टा येथील ग्रामपंचायतीत होणाèया महिलासभेची जबाबदारी सोपविण्यात आली. सोबत क्षेत्र समन्वयक रजनी शिरभय्ये आणि प्रकल्प संसाधन व्यक्ती वेरान्ना मदतीला होते. ग्रामपंचायतीअंतर्गत रसपल्ली, मेडपल्ली, येदरंगा, येरागड्डा व जिमलगट्टा या पाच गावांचा समावेश होतो. 

प्रथम आम्ही ग्रामसभेचे महत्त्व, महिलांचा सहभाग, त्यांच्याशी निगडित प्रश्न व मनरेगा या योजनेविषयी सविस्तर चर्चा केली. या भागात गोंडी व तेलगू भाषा बोलणा-या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संवादासाठी प्रकल्प संसाधन व्यक्ती (PRP) व त्या गावांतील अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती (ICRP) यांची मदत घेतली. स्वयंसहायता बचतगटातील महिला ग्रामसभेत अधिकाधिक कशा सहभागी होतील, यावर आम्ही भर दिला. नियोजनानुसार गावांतील गटांना भेट देऊन ग्रामसभेची माहिती दिली. सलग तीन दिवस फिरून ग्रामसभेचे महत्त्व सांगितले. अनेक महिलांना महिला ग्रामसभा नावाचा प्रकार असतो, हे पहिल्यादांच माहित झाले. ग्रामसभेत महिलांनाही जाता येते आणि तेथे त्यांना आपले मत मांडता येते, हे सांगितल्यावर अनेकांच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव दिसले. मनरेगाचे महत्व सांगितले आणि कामाची मागणी नोंदविल्याने काय फायदा होतो, याचीही माहिती दिली. सलग तीन दिवस जागृतीचे काम केल्यानंतर महिलांचा काय प्रतसाद मिळतो, याची आम्हा तिघांनाही उत्सुकता होती. रोवणी नसल्यामुळे महिलाना सवड होती. पण, अचानक १३ तारखेला जोरदार पाऊस आला. पाऊस आल्यामुळे परत रोवणी सुरू होणार होती. त्यामुळे ग्रामसभेला महिला येतील की नाही, अशी आम्हाला साशंकता होती. 

१४ ऑगस्टला सकाळी आम्ही तिघेही ग्रामपंचायतीत गेलो. संबंधितांशी चर्चा केली. मात्र, महिला ग्रामसभेचे कुणाला सोयरसुतक असल्याचे दिसले नाही. ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे पत्र पोचले होते. मात्र, हा सर्व कागदोपत्री सोपस्कार असल्याने चर्चेनंतर लक्षात आले. या चर्चेनंतर आमच्यावरचे दडपण वाढले. महिलांच्या उपस्थितीबद्दल आमच्यात साशंकता वाढली. सकाळचे १० वाजत आले होते. सगळ्या महिलांना ११ वाजताची वेळ दिली होती. तोपर्यत कशाबशा ५ ते ६ महिला आल्या होत्या. आलेल्या महिलांना ग्रामपंचायतीच्या सभागृहात बसण्यास सांगितले. हळूहळू महिलांची संख्या वाढत गेली. ११ वाजत आले होते. ग्रामसभेला सुरुवात होणार इतक्यात बाहेर महिलांचा गलका ऐकू आला. तिघेही बाहेर येऊन बघतो तो काय, सुमारे दीडशेच्या आसपास महिला जमलेल्या. कमी संख्या असल्यामुळे सुरूवातीला सभागृहात सभा घेण्याचे ठरले होते. पण, आता सभागृहात सभा शक्य नव्हती. बाहेरच्या मोकळ्या जागेतच सभेला सुरूवात झाली. महिला बोलतील का? आपले प्रश्न, समस्या मांडतील का? अशी वारंवार शंका येत होती. आजपर्यंत ग्रामपंचायतीत महिला ग्रामसभा झाली नसल्याचे काही महिला सांगत होत्या. ग्रामसेवकांनी सभेसाठी सरपंचांना बोलावले होते. 

सभेला सुरुवात झाली. गटातील महिलांनी सभेची सुरुवात ‘इतनी शक्ती हमे देना या प्रार्थनेने करण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रामसेवक आणि सरपंचांनी परवानगी दिली. स्वयंसहायता गटाची प्रार्थना ग्रामसभेची प्रार्थना झाली. प्रत्येक महिलांनी अत्यंत मुद्देसूद व शांतपणे आपले प्रश्न मांडले. कुठलीही गडबड नाही की, गोंधळ नाही. एका महिलेचा मुद्दा, प्रश्न मांडून झाल्यानंतरच दुसरी महिला आपला मुद्दा मांडत होती. इतक्या शिस्तबद्ध्पणे चालणारी सभा पाहून सरपंच व ग्रामसेवकसुद्धा आश्चर्यचकित झाले. ब-याच महिलांनी रोजगार हमी योजना, पांदन रस्ते, नाल्या, सार्वजनिक तलाव यावर चर्चा केली. त्यानंतर रसपल्ली, मरपल्ली व येदरंगा या गावांतील महिलांनी वैयक्तिक शौचालयाची मागणी केली व संपूर्ण गाव हागणदारीमुक्त करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. जी महिला वैयक्तिक शौचालय बांधूनसुद्धा त्याचा वापर करणार नाही, त्या महिलेला गटामार्फत दंड लावावा, अशीही काही महिलांनी भूमिका मांडली. ग्रामसभेत यापूर्वी कधीही न आलेल्या किंवा समुदायासमोर गप्प राहणा-या महिलांही हिरिरीने बोलल्या. हे सर्व वातावरण उमेदच्या सहका-यांचे बळ वाढविणारे ठरले. ही ग्रामसभा माझ्यासाठी अनुभवाचे गाठोडे ठरली.


प्रमोद चिंचुरे
ता. व्यवस्थापक (क्षमता बांधणी)
उमेद, तालुका अभियान कक्ष, 
अहेरी

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.