गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यापासून दोन किलोमिटरवर तळेगाव नावाचे गाव आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. इतर उदरनिर्वाहाची साधने कमीच आहेत. याच गावातील हिरकन्या राऊत ही महिला गरिबीत जीवन जगत होती. तिच्यासोबत तिची विधवा आई राहत असल्याने तिच्यावर अधिक भार पडायचा. शेतीमजूरीत दैनदिन खर्च भागविणे तिला कठीण जायचा. विधवा आईचे आजारपण हा आणखी महत्वाचा खर्च तिला सोसावा लागायचा. आईला निराधार योजनेचे अर्थसाहाय्य मिळत असल्याने थोडीफार मदत व्हायची.
१६ मार्च २००७ रोजी या गावातील १३ महिलांनी एकत्र येऊन संतोषी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना केली. दारिद्य्ररेषेखाली येणारी हिरकन्या राऊत यासुद्धा स्वयंसहायता गटाच्या सदस्या झाल्या.
संतोषी महिला स्वयंसहायता बचत गटाने अवघ्या १५ दिवसांतच कुरखेडा येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडले. १३ महिलांनी प्रत्येकी ५० रुपये याप्रमाणे मासिक ६५० रुपये इतकी नियमित बचत सुरू केली. हिरकन्या राऊत विधवा असून, द्ररिद्रयात जीवन जगत होती. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या बैठकांमध्ये विविध विषयावर चर्चा केली जायची. यात तिला इंदिरा आवास योजनेबद्दल माहिती मिळाली. हिरकन्याकडे राहण्यासाठी व्यवस्थित घर नव्हते. त्यामुळे तिने बैठकीमध्ये इतर सदस्यांकडून या योजनेची पूर्ण माहिती घेतली. तिला ग्रामसभेत घरकुलसाठी मागणी करण्याबाबत सुचविण्यात आले. त्यानुसार तिने ग्रामसभेत घरकुलाची मागणी केली. शासकीय योजनेतून तिला घरकुल मंजूर झाल्याने तिच्या निवा-याची चिंता मिटली. परंतु कायमस्वरुपी उपजीविकेच्या साधनांची तिला गरज होती. हंगामी कामे करून ती गुजराण करीत असल्याने तिच्यासमोर नेहमी अडचणी यायच्या. स्वयंसहायता गटाच्या बैठकित तिला व्यवसायासाठी कर्ज मिळत असल्याची माहिती मिळाली. मात्र, बॅकेऐवजी तिने गटातून कर्ज मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली. लवकर आणि गावातच उपलब्ध होत असल्याने तिने बचतगटाच्या कर्जाचा पर्याय निवडला.
मुलभुत सुविधेसाठी स्वयंसहाय्यता बचत गटाकडून तिला ४ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. यातून तिने वेळेवर आणि आवश्यकतेनुसार दोन शेळ्या खरेदी केल्या. या शेळ्यांचे चांगले संगोपन केल्याने शेळ्यांची संख्या वाढली. आज हिरकन्या राऊतकडे २२ शेळ्या आहेत. तिने दोन वर्षांत कर्जाची परतफेड सुदधा केली आहे. शेळ्यांची संख्या वाढल्याने तिला कायमस्वरुपी उपजीविकेचे साधन मिळाले आहे. पाच-सहा वर्षांच्या कालावधीत हिरकन्येच्या आर्थिक स्थितीत झालेला बदल, इतर सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. उपजिविकेच्या साधनांची योग्य निवड केली आणि वेळेवर आणि आवश्यकतेनुसार पतपुरवठा झाल्यास ग्रामीण भागातील जीवनमान उंचावता येते, हेच या उदाहरणांवरुन दिसून येते.
महेन्द्रकुमार पी. बिसेन
तालुका व्यवस्थापक, उमेद
तालुका कुरखेडा, जि. गडचिरोली
0 प्रतिक्रिया:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.