ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post

उमेद अभियानाच्या माध्यमातुन ग्रामीण भागात उपजीविकेच्या शाश्वत साधनांमध्ये वाढ करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देवून जमिनीची उत्पादकता वाढावी तसेच एकरी उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. 


गडचिरोलीत प्रमुख पीक धान आहे. बहुतेक शेतकरी अल्पभूधारक असल्याने तसेच धानाची शेती पारंपरिकरीत्या केली जात असल्याने एकरी उत्पन्न फारच कमी आहे. सध्या उपलब्ध साधनसामुग्रीचा मेळ घालून एकरी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीवर आधारित उपजीविका साधनाचा विचार करता धानाचे उत्पादन वाढविण्याकरिता उमेद अभियानाच्या माध्यमातून नवीन प्रयोग हाती घेण्यात आला तो म्हणजे श्री पद्धतीने धानाची लागवड होय. श्री पद्धत ही लघु व सिमांत शेतकèयांकरिता खूप फायदेशीर आहे. पारंपरिक पद्धतीमुळे एकीकडे शेतीचा खर्च वाढत असला, तरी दुसरीकडे एकरी उत्पादन मात्र घटत चालले आहे. यामुळे शेतकरी हताश होत आहेत. अशा परिस्थितीत श्री पद्धतीचा अवलंब करणे हेच शेतक-यांच्या हिताचे आहे. श्री पद्धतीने धानशेती केल्यास बियाणे, खते व पाण्याची बचत होते. त्याचबरोबर उत्पन्नात २० ते ३० टक्क्यांनी वाढही होते.

श्री पद्धत 
धानाचे उत्पन्न वाढविणे म्हणजे जास्त क्षेत्रावर धान लावणे नसून, त्याच क्षेत्रात लावणीतील बदल करून उत्पादन वाढविणे होय. 

श्री पद्धत लागवडीतील महत्वाचे मुद्दे
१. शेतात जास्तीत जास्त सेंद्रिय खते व पिकांच्या अवशेषांचा वापर करावा.
२. ८ ते १४ दिवसांची रोपे लागवड करावी.
३. तंतुमुळे न तोडता रोपांची मातीसहित उथळ व सरळ लावणी करावी.
४. लवकर येणा-या धान जातीची २० गुणिले २० सेमी अंतरावर तसेच मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणाची २५ गुणिले २५ से.मी. अंतरावर प्रती चूड एक रोप लावून लावणी करावी.
५.बियाणे साधारणत २ कि.ग्रॅम प्रती एकर वापरावे
६.तण नियंत्रणासाठी कोनोविडरचा वापर करावा.
७.प्राथमिक अवस्थेत धान गाठ्यात जमीन सतत ओली राहील, याप्रमाणे नियंत्रित पाणी द्यावे.

श्री पद्धतीचे फायदे
१. या पद्धतीच्या वापरामुळे बियाण्यांची बचत होते.
२.पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक पाण्याची बचत होते.
३.पीक जातीनिहाय साधारणत: एक आठवडा लवकर तयार होते व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
४.प्रचलित पद्धतीपेक्षा २०ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते.
तुलनात्मक दृष्टीने बघता एकूण खर्च प्रती एकर श्री पध्दतीमध्ये किंचित जास्त आहे. कारण तण काढण्याकरिता मशीनचा खर्च गृहीत धरला गेला. परंतु एका कोनोविडरच्या मदतीने २८ ‍िक्वटल उत्पादन प्रती एकर काढणे म्हणजे हा खर्च नगण्य समजावा लागेल. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत श्री पद्धतीने शेती केल्यास निव्वळ नङ्का २२ हजार ३५० इतका मिळतो. हा नफा पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ५ ते ६ पटीने जास्त आहे. श्री पद्धत म्हणजे कुठलेही त्रासदायक तंत्र नसून, धान लागवडीच्या पद्धतीत निव्वळ बदल होय. यामध्ये बियाण्यांची, खताची व पाण्याची बचत होते व उत्पादनात २० ते ३० टक्क्याने वाढ होते. आजच्या काळात श्री पद्धत ही शेतक-यांसाठी संजीवनी म्हणावी लागेल. 


राजेंद्र इंगळे 
जिल्हा व्यवस्थापक
(उपजीविका-शेती आधारित), उमेद
जिल्हा गडचिरोली

0 प्रतिक्रिया:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.