
मोहगाव हे गाव कुरखेडा तालुक्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूने जंगल आहे. या गावाची लोकसंख्या ६४६ असून, कुटुंबसंख्या १६५ आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीला पूरक असे व्यवसायही केले जातात. शेती पूर्णत: निसर्गावर अवंलबून आहे. त्यामुळे शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकत नाही. याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर दिसून येतो. १५ ऑगस्ट २००४ रोजी मोहगाव येथील १० कुटुंबातील प्रत्येकी एका महिलेनी एकत्र येऊन वैष्णवी महिला स्वयंसहायता बचतगटाची स्थापना केली. गटाची मासिक बचत २० रुपये असून, कढोली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत गटाचे खाते आहे. वैष्णवी महिला स्वयंसहाय्यता बचतगटातील सर्व सदस्य मासिक सभा घेतात. नियमीत बचत, गटांतर्गत कर्ज देऊन त्या आपल्या कौटुंबिक गरजा भागवितात. बैठकांत सामाजिक समस्यांवर चर्चा करतात.
मोहगाव येथे सरकारी स्वस्त धान्य दुकान नसल्यामुळे त्यांना धान्यासाठी बाहेरगावी जावे लागत होते. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय व्हायचा. वैष्णवी महिला बचतगटाने या विषयांवर मासिक सभेत चर्चा केली. सरकारी स्वस्त धान्य दुकान गावातच असले, तर वेळेवर धान्य उपलब्ध होईल व वेळेची बचत होईल, असा सर्वांनी विचार मांडला. गटाच्या माध्यमातून सरकारी स्वस्त धान्य दुकान चालविता येते, अशी माहिती पंचायत समिती कुरखेडाकडून मिळाली होती. त्यामुळे महिलांनी स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज करण्याचे ठरविले. सरकारी स्वस्त धान्य दुकानासाठीचा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला. दुकान चालविण्यासाठी पैसे हवे असल्याने गटाने बँकेकडे रीतसर अर्ज केला. १९ जून २०१२ रोजी बँक ऑफ इंडियाने गटाला ५० हजार रुपयांचे व्यवसाय कर्ज दिले. रीतसर कार्यवाही पूर्ण केल्यानंतर गटाला २ मे २०१२ सरकारी स्वस्त धान्य दुकान मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले. कर्ज मिळाल्याने त्यांना दुकान सुरू करण्यास अडचण आली नाही. मागील दोन वर्षांपासून वैष्णवी महिला स्वयंसहायता बचतगट चांगल्या प्रकारे दुकान चालवत आहे. यातून होत असलेल्या नफ्यामुळे बचतगटातील महिलांच्या गरजा भागत आहेत. स्वस्त धान्य दुकान गावांतच सुरू झाल्याने इतर गावक-यांची गैरसोय दूर झाली आहे तसेच महिलांना बचतीचे महत्व कळले आहे.
विनोद टी. धुर्वे
क्षेत्र समन्वयक, कढोली-सावलखेडा
उमेद, तालुका कुरखेडा
क्षेत्र समन्वयक, कढोली-सावलखेडा
उमेद, तालुका कुरखेडा
0 प्रतिक्रिया:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.