गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी पंचायत समिती क्षेत्र तसे अतिदुर्गमच आहे. या क्षेत्रातील ढोरगटटा गाव धानो-यावरुन तब्बल ७२ किलोमिटर इतके दूर आहे. जंगल झुडपात लपलेल्या या गावांतील ८३ कुटुंबांत ३५४ लोक राहतात. अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्गातील नागरिक इथे राहातात. गावांत इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. पेंढरी ग्रामपंचायतीत मोडणा-या या गावासाठी जवळची बाजारपेठ आणि बँक सुविधा पेंढरी इथेच आहे. नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या या गावांत काही क्षणाकरीता मन रमत असलं, तरी इथली गरीबी बघितली की मन विषण्णं होतं.
अशा या अतिदुर्गंम व जंगल झुडपात लपलेल्या ढोरगटटा गावाचा शहराशी फारसा संपर्क आलेला नाही. शासनाच्या अनेक योजना गावात पोचलेल्या नाहीत. ज्या पोहोचतात त्या अर्धवट स्वरुपात. या गावात ३ जुने स्वयंसहायता गट होते. मात्र, ते विस्कळित स्वरूपात होते. बँकखाते चालू होते. मात्र, बचत भरणे बंद होते. कुणाचे मार्गदर्शन नव्हते. बँकेचे कर्ज तीन वर्षापासून परतफेड केलेले नव्हते. बैठका नाही, बचत नाही, अंतर्गत कर्जव्यवहार नाही, परतफंड नाही, पुस्तक लिखाण नाही, अशी गटांची स्थिती होती. अशा काहीशा निस्तेज स्वयंसहायता गटांना सक्षम व स्वत:च्या बळावर उभे राहण्याएवढे बळ देण्याकरिता उमेदचा तालुका अभियान कक्ष पुढे सरसावला. गावात प्रवेश व स्वयंसहायता गटांची सभा घेऊन अभियानाचे महत्व पटवून सांगण्यात आले. सर्वप्रथम गट विस्कळित होण्यामागच्या कारणांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर गटाचे महत्व समजावून सांगण्यात आले. गटात होणा-या बैठकांमध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक चर्चा केल्यानंतर कुटुंबांच्या, समाजाच्या समस्या कशा दूर होवू शकतात, याची माहिती देण्यात आली. या बाबी महिलांना पटल्या. पूर्वीच्या गटात कुठल्या चुका झाल्या, हे त्यांच्या लक्षात आले आणि महिलांत नवी उमेद निर्माण झाली. गट पंचसूत्रीचा अवलंब करू लागले. त्यांनी ३ वर्षापासून थकीत असलेल्या कर्जाची परतफेड केली. संपूर्ण गावातील महिलांचा गटांमध्ये सहभाग असावा, यासाठी खुद्द काही महिलांनीच पुढाकार घेतला. ३ जुन्या गटांसह आणखी २ नवीन गट तयार झाले. सर्व गट पंचसूत्रीचा अवलंब करु लागले आहेत. स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून महिलांत आर्थिक जागृतीसोबतच सामाजिक जागृती कशी निर्माण होते व याचा परिणाम गावाच्या विकासासाठी कसा होतो, हे ढोरगटटातील या प्रक्रियेतून अनुभवास आले.
जॉब कार्ड आले, शिधापत्रिकाही मिळाल्या!
स्वयंसहायता बचतगटातील महिला स्वयंसहायतेचे सूत्र अनुसरून स्वत:च्या आर्थिक समस्या तर सोडवितातच. परंतू गावातील समस्यांची सोडवणूक करण्याकरिता त्या पुढाकार घेतात आणि कृतीही करतात. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामधील ढोरगटटात नागरिकांशी चर्चा करताना शिधाधारकांच्या अनेक समस्या असल्याचे आढळून आले. स्वयंसहायता बचतगटाच्या बैठकांतही हा मुददा आला. यासंदर्भात उमेदतर्फे विविध शासकिय योजनांमुळे खर्च कसा वाचतो, याचा माहिती देण्यात आली होती. महिलांनी सर्वांकडे शिधापत्रिका असाव्यात, असा निर्णय घेतला. लागलीच तशी यादीही तयार करुन घेतली. शिधापत्रिका नसलेल्यांची नावे वेगळी काढण्यात आली. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा प्रत्येक कुटूंबाला तालुक्याच्या ठिकाणी येवून कागदपत्रे तयार करणे शक्य नव्हते किंवा परवडणारे नव्हते. त्यामुळे गावांतच सभा आयोजित करण्यात आली आणि थेट ग्रामसेवक, तलाठी, रोजगार सहायक, मंडल अधिकारी, पुरवठा अधिकारी आदींना या सभेसाठी बोलाविण्यात आले. त्यात इतरही समस्या मांडण्यात आल्या. चर्चेनंतर शिधापत्रिकांसाठी आवश्यक ती प्रकरणे तयार करणे आणि तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात पोचविण्याची जबाबदारी गावातील दोन शिक्षीत युवकांनी स्वीकारली. आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याने सर्वांचा शिधापत्रिकांचा प्रश्न मिटला. याच प्रकारे सर्वांचे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड काढण्यात आले. गाव एकत्र आल्याचे बघून एरवी अनियमित असणारा शिधापुरवठाही संबंधित व्यक्तिने नियमित केला. या संघटीतपणाचा परिणाम रोजगारसेवक, ग्रामसेवक आणि तलाठयांवरही दिसून येवू लागला. ही मंडळी कार्यालयीन कामकाजासाठी आता अधिक वेळ देत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
(सांख्यिक माहिती स्रोत : जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवाल, गडचिरोली, अर्थ व सांख्यिकी संचालनालय)
कुंदा देवतळे
तालुका व्यवस्थापक (आजीविका)
उमेद, तालुका धानोरा

0 प्रतिक्रिया:
Post a Comment