ताज्या घडामोडी
Loading...
Wednesday, 5 November 2014

Info Post

पारपनगुडा हे एटापल्ली तालुक्यातील जारावंडी -कसनसुर क्षेत्रात येणारे गाव. अतिदुर्गम कसनसुर या गावापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या पारपनगुडा या गावांची कुटूंबसंख्या अवघी ५८ इतकी आहे. गावाची लोकसंख्या ४४८ असून, महिला पुरुषांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. गावात चवथीपर्यत शाळा असून, अंगणवाडी सुद्धा आहे. गावातील सर्वंच कुटुंब ‘माडियाङ्क या आदिवासी जमातीची आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून, शेती तसेच जंगलातून प्राप्त होणाèया वनोपजावर गावक-यांचा उदरनिर्वाह चालतो. हे गांव अतिदुर्गम असल्याने गावांत माहितीचा व सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, रोजगार इत्यादीविषयी लोकांमध्ये कोणतीही जागरूकता दिसून येत नाही. तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गरिबी निर्मुलनाच्या कामाला सुरुवात झाली असून, येथे SERP या आंध्रप्रदेश स्थित संस्थेच्या कार्यपद्धतीनुसार कामे सुरू आहेत. पारपनगुडा गांवात स्वयंसहायता गटाबाबत पोलिस पाटील व इतर गावक-यांशी चर्चा केली असता सुरूवातीला गावक-यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे उमेदच्या सहका-यांनी या गावक-यांना वेगळ्या पद्धतीने महत्व पटवून देण्याचे ठरविले. उमेदचे सहकाèयांनी आधी गावक-यांना आजूबाजूच्या गावांत सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. स्वयंसहायता गटामुळे कसे बदल होतात, हे समजावून सांगितले. त्यामुळे गावक-यांनी हळूहळू प्रतसाद द्यायला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात गावाचे सर्वेक्षण करण्यात आले. गावांत महिलांची नेमकी काय स्थिती आहे, याचा अभ्यास करण्यात आला. गावातील उपलब्ध सोई-सुविधांची पाहणी करण्यात आली. त्यांनतर गरिबी म्हणजे काय, तिचे दुष्परीणाम व त्यातून बाहेर पडण्याकरिता कशाप्रकारे स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून मार्ग काढला जाऊ शकतो, याची सविस्तर माहिती देण्यात आली. या गावात १५ दिवसांच्या कालावधीत ५ नवीन स्वयंसहाय्यता गटांची निर्मीती करण्यात आली. पंचसूत्रीचे पालन, रोजगार निर्मिती, उपजीविकेची साधने याविषयावर माहिती दिल्यानंतर महिलांच्या एकत्रिकरणाचा कसा उपयोग होतो, यावर चर्चा करण्यात आली. स्वयंसहायता गट सुयोग्य रितीने चालावे, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

सुरूवातीला फारसा प्रतसाद न देणा-या महिला हळूहळू लाजतबुजत संवाद करू लागल्या. बैठकांच्या निमित्ताने गावातील छोट्या-छोट्या समस्यांवर चर्चा होऊ लागली. मत मांडण्याचे धारिष्ट्य निर्माण झाले. गावात पिण्याच्या पाण्याकरिता २ हातपंप व घरगुती वापराच्या पाण्याकरिता विहीर आहे. या हातपंपाच्या शेजारी प्रचंड प्रमाणात घाण साचलेली होती. गावाचा परिसर सुद्धा अत्यंत अस्वच्छ होता. प्रशक्षण कालावधीत काही महिलांनी हा मुद्दा उपस्थित करून स्वत:च ही घाण दूर करण्याचा विचार मांडला. या विचाराचे इतर सदस्यांनी स्वागत करून लागलीच ही घाण स्वत:च दूर करण्याचा निर्णय घेतला. 


दुस-या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जय दुर्गादेवी, शारदादेवी, लक्ष्मी, सोनाली, कृष्णा या सर्व गटांच्या महिला आपापल्या घरून फावडे, घमेले घेऊन आल्या व त्यांनी जवळपास ४ तास श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. गावाच्या विकासाच्या कामात सहभागी झाल्याची भावना त्यांच्यातून व्यक्त होत होती. गावातील महिला असे कुठले पाऊल उचलतील, याची पुरूषमंडळीना अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे गावातील महिला स्वच्छता करत असल्याचे बघून पुरूषमंडळी अचंबित झाली. पुरूषमंडळीनी कुणाकडेही काहीही विचारणा न करता या कामास सहकार्य करणे सुरू केले. या घटनेमुळे संबंध गावच स्वच्छतेसाठी एकवटले असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर पुरूषांतही स्वयंसहायता गटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. यात सुरूवातीला विरोध करणारी मंडळीही होती. त्यांनी स्वत:हून गटाच्या कामकाजाची माहिती घेतली आणि यापुढे सहकार्य करण्याची भूमिका घेतली. या जागृतीच्या कार्यात उमेदचे सहकारी नितीन वाघमारे, संजीव रेड्डी यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. 


राम वगारहांडे
तालुका व्यवस्थापक (क्षमताबांधणी),
उमेद, तालुका एटापल्ली, जि. गडचिरोली

0 प्रतिक्रिया:

Post a Comment